जाब विचारण्यास गेला अन् मारहाणीत जीवास मुकला...


 कोल्हापूर : 'ये' अशी एकेरी हाक मारल्याच्या रागातून जाब विचारला, अन् झालेल्या बेदम मारहाणीत एक तरुण जीवास मुकला.

घटना कोल्हापुरात घडली. पंधरा दिवसापूर्वी मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा उपचारादरम्यान आज, शनिवारी दुपारी मृत्यू झाला. सागर राजेंद्र शिर्के (वय ३२ रा. १३२९, डी वॉर्ड, भूसारी गल्ली, उत्तरेश्वर पेठ) असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी दोघां संशयितावर खूनाचा गुन्हा नोंदवला. सौरभ प्रमोद सरनाईक (वय ३२ रा. देवणे गल्ली, मंगळवार पेठ), अक्षय अनिल साळोखे (वय ३० रा. शिवाजी पेठ) अशी संशयितांची नावे आहेत. संशयित कारागृहात आहेत.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सागर शिर्के हा चहा पावडर विक्रीचा व्यवसाय करतो, त्याला दोन जुळ्या मुले, पत्नी, आई, वडील व तीन भाऊ असा परिवार आहे. दि. २३ सप्टेंबरला मध्यरात्री सागर व मित्र प्रदीप उर्फ बाल्या धोंडीराम आबीटकर (वय ४३ रा. सोनाळी, ता. भदरगड) हे दोघे दुचाकीवरुन पापाची तिकटीकडून माळकर तिकटीकडे जात होते. त्याचवेळी सौरभ सरनाईक व अक्षय साळोखे हे दोघे संशयित आपल्या दुचाकीवरुन पापाची तिकटीकडे जात होते. त्यांनी सागर व प्रदीपला 'ये' अशी मोठ्या आवाजात एकेरी हाक मारली.

दोघांनी रागातच आपली दुचाकी वळवून संशयितांजवळ नेऊन त्याबाबत जाब विचारला. चौघामध्ये वादावादी झाली, सागरला रस्त्यावर पाडून लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. प्रदीप आबीटकरला मारहाण झाली. सागरच्या डोक्यास व छातीला गंभीर दुखापत झाल्याने तो बेशुध्द पडला. संशयित पळून गेले. तेथून निघालेल्या अलंकर शिवाजी गिरी (रा. उत्तरेश्वर पेठ) त्याने जखमी सागर व प्रदीप यांना उपचारार्थ खासगी रुग्णालयात दाखल केले. दि. २७ सप्टेंबरला गिरी याच्या फिर्यादीवरुन लक्ष्मीपुरी पोलीसांनी दोघां संशयितावर प्राणघातक हल्ल्याच्या गुन्हा नोंदवला.

Post a Comment

0 Comments