बापरे युवकच्या खिशातच मोबाईलने अचानक घेतला पेट



भंडारा - सध्याच्या युगात प्रत्येकाकडे मोबाईल फोन आहे. परंतु हाच मोबाईल तुमच्या जीवावर बेतू शकतो हे ऐकून तुम्हाला धक्का बसला असेल ना. कारण भंडाऱ्यात घडलेल्या एका दुर्घटनेत तरुणाचा जीव वाचला आहे.

पँटच्या खिशात ठेवलेल्या मोबाईल अचानक पेट घेतल्यानं युवक जखमी झाला. त्याच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात आले. भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यातील सौंदळ पुनर्वसन येथील ही घटना आहे.

अंकित भुते असं या २५ वर्षीय तरुणाचं नाव आहे. या दुर्घटनेत अंकित किरकोळ जखमी आहे. नेहमीप्रमाणे सकाळी घरातून निघताना अंकितनं मोबाईल खिशात ठेवला होता. गावातील सांस्कृतिक कार्यक्रमात असताना अचानक अंकितला काहीतरी जळण्याचा भास झाला. त्याने खिशात हात घालून पेटलेला मोबाईल बाहेर फेकून दिला. मात्र या घटनेत अंकितच्या मांडीला मोठी जखम झाली. यावेळी उपस्थित ग्रामस्थांनी तात्काळ अंकितला हॉस्पिटलला नेले. त्याठिकाणी डॉक्टरांनी त्याच्यावर उपचार केले.

या दुर्घटनेत अंकितच्या पायाचा काही भाग जळाला. त्याला उपचार करून घरी पाठवण्यात आले. याबाबत अंकित म्हणाला की, मी मोबाईल घेऊन जवळपास १४-१५ महिने झाले आहेत. आतापर्यंत काही समस्या जाणवली नाही. विवो कंपनीचा हा मोबाईल आहे. मी ओव्हर चार्जिंगही केली नव्हती असं त्याने म्हटलं.

Post a Comment

0 Comments