अपघाताचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. यातील काही व्हिडीओ इतके गंभीर असतात की हे व्हिडीओ पाहून अनेकांना धक्का बसतो. सध्या बंगळुरूमधील अशाच एका धक्कादायक अपघाताचा व्हिडीओ समोर आला आहे.
व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की एक महिला दुचाकीवरून जात होती. त्याचवेळी रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या कार चालकाने अचानक आपल्या गाडीचा दरवाजा उघडला. यामुळे मागून वेगाने येणारी दुचाकीस्वार महिला कारच्या दरवाजाला धडकली आणि रस्त्याच्या मधोमध पडली. ही घटना इथेच संपत नाही. यानंतर मागून येणाऱ्या दुसऱ्या कारने या महिलेला धडक दिली. लगेचच लोकांनी या महिलेला वाचवण्यासाठी धाव घेतली. ही घटना गेल्या महिन्यातील असल्याचं सांगितलं जात आहे.
कर्नाटकच्या राज्य रस्ते सुरक्षा प्राधिकरणाच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलंय, “सार्वजनिक रस्त्यावर तुमच्या गाडीचा दरवाजा उघडण्यापूर्वी, मागून येणाऱ्या वाहनांचा अंदाज घेण्यासाठी बाजूचा किंवा मागील व्ह्यू मिरर तपासा. यामुळे असे अपघात टाळण्यास मदत होईल. सावध रहा!”
0 Comments