शेततळ्यात बुडून आईसह तीन मुलींचा मृत्यु

 


रातून बेपत्ता असलेल्या आईसह तीन मुलींचे मृतदेह तलावात आढळून आल्याने जत तालुक्यात खळबळ उडाली आहे. सोमवारी पहाटे ही घटना उघडकीस आली. याप्रकरणी जत पोलिसांनी 'अकस्मात मृत्यू'ची नोंद केली आहे.

सुनीता तुकाराम माळी (वय 37), अमृता तुकाराम माळी (वय 13), अंकिता तुकाराम माळी (वय 10), ऐश्वर्या तुकाराम माळी (वय 7) अशी तलावात बुडून मृत्यू झालेल्या माय-लेकींची नावे आहेत.

तुकाराम चंद्रकांत माळी हे गावापासून अडीच किलोमीटर अंतरावर असलेल्या सुतार फाटय़ाजवळ वास्तव्यास आहेत. त्यांची शेती त्याच ठिकाणी आहे. शेतीलगतच लिंगनूर तलाव आहे. रविवारी सकाळपासून त्यांची पत्नी सुनीता व तिघी मुली बेपत्ता होत्या.

माळी यांनी पत्नीच्या माहेरी महादेव श्रीशैल्य माळी (रा. कोहळी, ता. अथणी) यांना फोन करून सुनीता तिकडे आली आहे का? अशी विचारणा केली. मात्र, सुनीता तिकडे नसल्याचे समजल्यानंतर त्यांनी शोधाशोध सुरू केली. रविवारी दिवसभर शोधाशोध करूनही चौघीही सापडल्या नाही.

अखेर अथणीहून महादेव माळी हे रविवारी रात्री 10 वाजता मुलगी बेपत्ता झाल्याची फिर्याद देण्यासाठी जत पोलीस ठाण्यात आले होते. यावेळी पोलिसांनी तुकाराम माळी यांच्या घरी जाऊन चौकशी करून 'मिसिंग'ची नोंद घेऊ, असे सांगितले. रात्री पोलीस, ग्रामस्थ व नातेवाईकांनी शोधाशोध केल्यानंतर तुकाराम माळी यांच्या घराच्या दक्षिणेला असणाऱया तलावात चौघींचे मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आले. सोमवारी पहाटे एक वाजता चौघींचे मृतदेह पाण्याच्या बाहेर काढण्यात आले. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केल्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. याप्रकरणी जत पोलिसांनी 'अकस्मात मृत्यू'ची नोंद केली असून, पोलीस उपअधीक्षक रत्नाकर नवले यांनी घटनेची कसून चौकशी करण्याचा आदेश दिला आहे.

Post a Comment

0 Comments