दीड किलो सोन्यावर पोलिसांचाच डल्ला ?

 


आटपाडी : कोलकाता येथे सोन्याच्या दुकानात काम करणार्‍या तरुणाला दोन किलो सोने सापडले. हे तिथल्या व्यापार्‍याला समजले. सोन्याचा हिस्सा मागण्यासाठी तो व्यापारी त्या तरुणाच्या मागे लागला.

तरुणाने सोने घेऊन आटपाडी तालुक्यातील बनपुरी गाव गाठले. त्या ठिकाणी त्याच्या मित्राकडे दोन किलो सोने दिले. याचा सुगावा व्यापार्‍याला लागल्यानंतर त्याने पोलिसांच्या मदतीने छापा टाकून सोने हस्तगत केले. पण, पोलिसांनी दोन किलो सोने हस्तगत करून त्यातील दीड किलो सोन्यावर डल्ला मारला. या सर्व प्रकाराची तक्रार जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे केल्यानंतर मात्र पोलिसांचे धाबे दणाणले आहेत.

याबाबत सागर जगदाळे (रा. करगणी, ता. आटपाडी) यांनी जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे तक्रार दिली आहे. याबाबत माहिती अशी की, सागर मंडले (रा. बनपुरी, ता. आटपाडी) हा कोलकत्ता येथे सोन्याच्या दुकानात कामाला आहे. त्याला कोलकात्यात दोन किलो सोन्याची लगड सापडली. याची माहिती कोलकाता येथील सोन्याचा व्यापारी सूरज मकबूल मुल्ला याला समजली. मुल्ला याने मंडलेकडे सापडलेले सोने मागितले. परंतु मंडले याने सोने देण्यास नकार देऊन बनपुरी गाव गाठले व ते सर्व सोने त्याने त्याचा मित्र सागर जगदाळे याच्याकडे दिले. ही माहिती मुल्ला याला समजल्यानंतर त्याने स्थानिक पोलिसांकडे तक्रार दिली. पोलिसांनी जगदाळे व मंडले यांच्या घरी छापा टाकला व दोन किलो सोने हस्तगत केले. परंतु, केवळ 455 ग्रॅम सोने रेकॉर्डवर दाखवून 1545 ग्रॅम सोने पोलिसांनी हडप केल्याचे जगदाळे यांनी तक्रारीत म्हटले आहे.


Post a Comment

0 Comments