पुण्यातील बांधकाम व्यावसायिकाची 14.50 कोटींची फसवणुक ....

 


पुणे: पाषाण येथील जमीन बांधकाम व्यावसायिकाला  विकसनासाठी देण्यात आली होती. परंतु विकसनाचा करार मोडून बांधकाम व्यावसायिकाची तब्बल 14 कोटी 50 लाखाची फसवणूक  केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

प्रकार  पुण्यातील पाषाण परिसरात सन 2006 ते जानेवारी 2023 या कालावधीत घडला आहे.

याबाबत बांधकाम व्यावसायिक विजय जगदीशचंद्र अगरवाल (वय-65 रा. नारंगीबाग रोड, पुणे) यांनी चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी अशोक शिवनारायण थेपटे  (व-74) आणि अमित अशोक थेपटे (वय-47 दोघे रा. मंत्री किशोर पार्क, भोसलेनगर, पुणे) यांच्यावर आयपीसी 420, 406,409, 464, 465, 467, 468, 471, 34 नुसार गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विजय अगरवाल यांनी स्वत: विकसित करण्यासाठी पाषाण येथील जमीन ऑगस्ट 2006 मध्ये घेतली होती. ही जमीन त्यांनी मे. गॅलेक्सी कन्स्ट्रक्शन अँड कॉन्ट्रॅक्टर प्रा. लि. चे संचालक अशोक थेपटे व अमित थेपटे यांना विकसनासाठी दिली होती. जमिनीवर विकसन करुन 55 टक्के फिर्यादी तर 45 टक्के आरोपी यांच्या कंपनीला देण्याचे ठरले होते.
संबंधित बांधकामाचा ताबा 15 महिन्यात करुन देण्याचे ठरले असताना आरोपींनी मुदतीत ताबा दिला नाही.
त्यामुळे 2007 व 2010 मध्ये फिर्यादी आणि आरोपी यांच्यात पुन्हा करार होऊन आरोपींना बांधकामासाठी मुदत देण्यात आली होती.
मात्र, त्यानंतरही आरोपींनी ताबा दिला नाही.

त्यामुळे फिर्यादी यांनी एप्रिल 2016 मध्ये नोटीस पाठवली. सर्व हक्क व पॉवर ऑफ अॅटर्नी संपुष्टात आली असताना आरोपींनी संबंधित हक्क आपल्याकडे असल्याचे दाखवून खोटे व बनावट कागदपत्रे तयार केली. ती कागदपत्रे खरी असल्याचे भासवून त्याद्वारे सेवा विकास बँक व धरमपेठ महिला मल्टीस्टेट को ऑप सोसायटी  यांच्याकडून 30 कोटी 75 लाख रुपये कर्ज घेऊन फिर्यादी यांच्या हिश्श्याचे 4 कोटी रुपयांचे 2500 स्के फुटाचे दुकान आणि 10 कोटी 50 लाख रुपये किंमतीचे 10 हजार 500 स्के फुटाचे ऑफीस न देता 14 कोटी 50 लाख रुपयांची फसवणूक केली.

दरम्यान फिर्यादी यांनी 2020 मध्ये याबाबत आर्थिक गुन्हे शाखेकडे  तक्रार अर्ज केला होता.
त्यावेळी आरोपी आणि फिर्यादी यांच्यात समझोता झाला होता.
मात्र आरोपींनी आर्थिक व्यवहार पूर्ण करण्यास टाळाटाळ केल्याने फिर्यादी यांनी पुन्हा नव्याने जानेवारी 2023 मध्ये तक्रार अर्ज केला होता.
या अर्जाची चौकशी केली असता आरोपींवर गुन्हा दाखल होत असल्याचे निष्पन्न झाल्याने आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुढील तपास आर्थिक गुन्हे शाखेच्या सहायक पोलीस निरीक्षक मनीषा टुले  करीत आहेत.


Post a Comment

0 Comments