नांदेडमध्ये अवकाळी पावसाचा बळी, वादळी वाऱ्याने भिंत कोसळली अन् होत्याचं नव्हतं झालं

 


नांदेड / राजीव गिरी : राज्यात अवकाळी पावसाने थैमान घातले आहे. अवकाळी पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. अवकाळीने झोडपून काढल्याने बागा उद्धवस्त झाल्या आहेत.

वादळी वाऱ्यामुळे घरांचेही नुकसान झाले आहे. नांदेडमधील बारड गावात पावसामुळे भिंत अंगावर कोसळून तरूणाचा  मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. काल रात्री घरी झोपला असताना ही घटना घडली. शिवराम गजभारे असे मयत तरुणाचे नाव आहे. शिवरामच्या मृत्यूमुळे कुटुंबीयांवर आणि बारड गावावर शोककळा पसरली आहे.

पावसामुळे घराची कच्ची भिंत कोसळली

शिवराम गजभारे हा तरुण गवंडी काम करतो. कालच्या पावसात घराची कच्ची भिंत भिजली. यामुळे रात्री उशिरा त्याच्या अंगावर ही भिंत कोसळून त्याचा मृत्यू झाला. बारड गावातील काही दुकानांसह कच्च्या घरांचे टिनशेड उडून गेले आहेत. त्यात काही व्यापाऱ्यांचे जबर नुकसान झालं आहे. विशेषतः मोठ्या प्रमाणात अन्न धान्य भिजल्यामुळे अनेकांचे मोठं नुकसान झाले.

अवकाळी पावसामुळे अनेक संसार उघड्यावर

नांदेडमध्ये काल सांयकाळी झालेल्या वादळी वाऱ्यासह गारपिट झाली. बारड गावातील अनेकांच्या घरांवरचे छत उडून गेले. टिन पत्रे उडून गेल्यामुळे बारड गावामधल्या अनेकांचे संसार उघड्यावर पडले आहेत. घरगुती साहित्य, कपडे आणि अन्नधान्य भिजून गेल्यामुळे अनेकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय. या नुकसानग्रस्त नागरिकांना तातडीची मदत देण्याची मागणी होत आहे.

Post a Comment

0 Comments