यवतमाळ: बसचा भीषण अपघात, दोन प्रवासी ठार

 


यवतमाळ : दारव्हा येथून नागपूरकडे जाणाऱ्या बसचा कामठवाडा (ता. दारव्हा) येथे भीषण अपघात झाला. या अपघातात दोन प्रवासी ठार तर १० पेक्षा अधिक प्रवासी गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

दुपारी १.१५ वाजताच्या सुमारास हा अपघात झाला. दारव्हा आगाराची दारव्हा-नागपूर (एमएच ४० वाय ५०२२) ही बस नागपूरकडे जात असताना कामठवाडा येथे समोरून येणाऱ्या मालवाहु वाहनाचे नियंत्रण सुटल्याने बसचा एका बाजूचा भाग चिरत गेला. हे मालवाहू वाहन पाईप घेऊन जात होते. या अपघातात दोन प्रवासी जागीच ठार झाल्याची माहिती आहे.

अपघात घडताच गावकऱ्यांसह मागाहून आलेल्या एसटीतील प्रवाशांनी मदतकार्य सुरू करून जखमींना बसच्या बाहेर काढले. अपघातात १० पेक्षा अधिक प्रवासी गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी यवतमाळ येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हलविण्यात आले. मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. अपघातातील मृत व जखमी प्रवाशांची नावे अद्याप कळली नाहीत. घटनेची माहिती मिळताच लाडखेड पोलिसांसह एसटीचे अधिकारी घटनास्थळी पोहचले.


Post a Comment

0 Comments