जाळीत अडकलेल्या कावळ्याला चिमुरड्याने सोडवून केले मुक्त

 


नवी दिल्ली : आपल्या देशात भूतदयेला प्राचीन काळापासूनच महत्त्व आहे आणि पिढ्यान् पिढ्या हेच संस्कार आपल्यावर होत आलेले आहेत. त्याचीच प्रचिती देणारा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहे.

त्यामध्ये एक चिमुरडा शाळकरी मुलगा शाळेच्या आवारातील जाळीत अडकलेल्या कावळ्याला सोडवून त्याला आकाशात भरारी मारण्यासाठी मुक्त करीत असल्याचे दिसतो.

एका ट्विटर अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. त्यामध्ये दिसते की, हा चिमुरडा मुलगा कावळ्याला जाळीतून सोडवण्यासाठी प्रयत्न करतो. एका हाताने कावळ्याला अलगद पकडून तो दुसर्‍या हाताने त्याच्या पंख व पायांमध्ये अडकलेली जाळी सोडवतो. कावळा मोकळा झाल्यावर आपल्या मित्र-मैत्रिणींकडे पाहून तो मोकळे हास्य करतो. त्याचे सवंगडीही लगेचच या कावळ्याला पाहण्यासाठी धावत येतात. कुणी कावळ्याच्या डोक्यावरून हातही फिरवतो. त्यानंतर अधिक काळ कावळ्याला पकडून न ठेवता हा मुलगा लगेचच त्याला हातातून मोकळे करतो व कावळा आकाशात झेप घेतो. ते पाहून ही चिमुरडी मुलेही आनंदाने ओरडत धावतात!

कावळा उडून गेल्यावर विद्यार्थ्यांनी आनंदाने टाळ्याही वाजवल्या. हा व्हिडीओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे, 'एक दयाळू हृदय असंख्य जीवांना स्पर्श करते.' हा व्हिडीओ नेमका कुठला आहे हे समजू शकले नसले तरी आतापर्यंत तो 41 हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. तर यावर अनेक नेटकरी वेगवगळ्या प्रतिक्रिया देत व्हिडीओतील मुलाचे तोंडभरून कौतुक करत आहेत. एका नेटकर्‍याने लिहिले आहे, 'खूप छान! किती विचारी आणि संवेदनशील मुलगा आहे.'


Post a Comment

0 Comments