आई रागावली म्हणुन तरूणाने तळ्यात उडी मारून स्वतः ला संपविले

 


वाघोली : वाघोली येथील वाघेश्वर मंदिराच्या तळ्यामध्ये १९ वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्याची घटना शनिवारी (दि. ४) सकाळी घडली. आई रागावल्याच्या किरकोळ कारणावरून आत्महत्या केल्याचे प्राथमिक चौकशीत समोर आले आहे.

पवन शिवाजी मगरे (वय १९, रा. विमान नगर) असे या तरुणाचे नाव आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, आई रागावली म्हणून तो तरुण वाघोली येथे आला. पुणे नगर महामार्गालगतच्या संरक्षण भिंतीवरील जाळीवरून उडी मारून तो तळ्याजवळ आला. ताे तेथील झाडाखाली थाेडा वेळ बसला होता. त्याने तेथेच उपस्थित असलेल्या एकाचा मोबाइल घेऊन आईला फोन लावला. मात्र आईने त्यावेळी फोन उचलला नाही. नंतर आईने त्यावर पुन्हा फोन केला. यावेळी त्याने तळ्यात उडी टाकून आत्महत्या केल्याचे त्यांना समजले. पोलिसांना माहिती कळताच तात्काळ पोहोचले होते, परंतु ताेपर्यंत तो बुडाला होता.

वाघोली पीएमआरडीए अग्निशमन दलाला रेस्क्यू कॉल देण्यात आला. अग्निशमन दलाने व लोणीकंद पोलिसांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढला. तळ्यात तरुणाने आत्महत्या केल्याचे समजताच बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. वाघोली पोलिस चौकीचे उपपोलिस निरीक्षक राहुल कोळपे, त्यांचे सहकारी आणि वाघोली पीएमआरडीए अग्निशमन दलाचे केंद्र अधिकारी विजय महाजन, संदीप शेळके, प्रकाश मदने, अभिजित दराडे, मयूर गोसावी, प्रशांत अडसूळ, संदीप तांबे, सचिन गवळी, उमेश फाळके यांनी बुडालेल्या तरुणाचा मृतदेह बाहेर काढला.


Post a Comment

0 Comments