५० रुपयांसाठी पत्नीचा खून, आरोपी पतीस अटक

 


इगतपुरी तालुक्यातील वाडीवऱ्हे परिसरातील सांबरवाडी (गणेशवाडी) येथे दारू पिण्यासाठी बायकोने ५० रुपये दिले नाही म्हणून राग आल्याने दारुड्या नवऱ्याने लोखंडी रॉड बायकोच्या डोक्यात मारून निर्घृण खून केल्याची घटना घडली आहे.

याबाबत वाडीवऱ्हे पोलिस ठाण्यात मृताचा मुलगा राकेश मोरे याने फिर्याद दिली आहे.

घटनेबाबत वाडीवऱ्हे पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल केला असून, दारुड्या नवऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. घटनेचे गांभीर्य ओळखून वाडीवऱ्हे पोलिस ठाण्याचे प्रभारी पोलिस निरीक्षक बिपीन शेवाळे यांनी तत्काळ कर्मचारी सोमनाथ बोराडे, नीलेश मराठे, गायकवाड, पवार, चौधरी या कर्मचाऱ्यांसोबत घटनास्थळी धाव घेत आरोपीला ताब्यात घेतले. घटनेचे गांभीर्य पाहून उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. अर्जुन भोसले यांनीही घटनास्थळी भेट देत तपासाबाबत सूचना केल्या. पुढील तपास वाडीवऱ्हे पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक बिपीन शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली वाडीवऱ्हे पोलिस पथक करत आहे.

सांबरवाडी (गणेशवाडी) येथील संशियत आरोपी लालू सोपान मोरे हा पत्नी, मुलगा व सून यांच्या सोबत राहतो. त्याचा मुलगा राकेश सोपान मोरे, वय २३ वर्षे हा मासेविक्रीचा व्यवसाय करतो. त्याने वाडीवऱ्हे पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, काल रात्री वडील लालू सोपान मोरे दारू पिऊन घरी आले. बायको मीराबाईकडे तो ५० रुपये दारू पिण्यासाठी पुन्हा पुन्हा मागत होता. मात्र, तिने नकार देताच त्याने शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. मुलगा राकेश व सून बाहेर पडवीत झोपण्यासाठी गेले असता मीराबाई घरात एकटीच झोपल्याची संधी साधून रात्री ९.३० ते १० च्या दरम्यान वडील लालू सोपान मोरे यांनी आतून दरवाजा लावून घेत पैसे न दिल्याचा राग मनात धरून मीराबाई (वय ४५) हिला मुसळ म्हणून वापर करीत असलेल्या लोखंडी रॉडने जोरदार प्रहार केले. यामुळे ती रक्ताच्या थारोळ्यात पडली. गोंगाट ऐकून मुलगा व सून दरवाजा वाजवू लागले. काही वेळाने लालू याने स्वतःच दरवाजा उघडून मुलाला तुझ्या आईला मारून टाकल्याचे म्हणत तुला काय करायचे ते कर, असे सुनावले. राकेशने वेळ न दवडता १०८ नंबरला कॉल करून रुग्णवाहिका बोलावली. रुग्णवाहिकेतील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मीराबाईला मृत घोषित केले.

Post a Comment

0 Comments