कराड- मसूर रस्त्यावर यशवंतनगर (ता. कराड) गावच्या हद्दीत सह्याद्री कारखान्याजवळ तळबीड पोलिसांनी कंटेनरसह 1 कोटी 13 लाखांचा गुटखा पकडला.
त्यापैकी केवळ गुटख्याची किंमत 84 लाख रुपये आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल वरुटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने नाकाबंदी करून पहाटे साडेतीन वाजण्या.च्या सुमारास ही कारवाई केली. या कारवाईत पोलिसांनी कंटेनरसह दोघांना ताब्यात घेतला आहे.
याबाबत पोलिसांनी सांगितले की, कर्नाटकमधून गुटखा भरलेला कंटेनर महामार्गावरून पुणे बाजूकडे जात असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल वरुटे यांना गोपनीय बातमीदाराकडून समजली. त्यानुसार त्यांनी मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलीस पथक तयार करून कराड-मसूर रस्त्यावर यशवंतनगर गावच्या हद्दीत सह्याद्री कारखान्यालगत नाकाबंदी करून वाहन तपासणी मोहीम सुरू केली. सोमवारी रात्री सुरू केलेली ही मोहीम मंगळवारी पहाटेपर्यंत सुरू होते. याच दरम्यान पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास मिळालेल्या माहितीच्या आधारे मोठा कंटेनर या रस्त्यावरून आल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी त्वरित कंटेनर थांबवून चालक व क्लीनरकडे विचारपूस केली असता. प्रथमतः त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे सपोनी राहुल वरुटे यांना संशय आल्याने त्यांनी कंटेनरची तपासणी केली असता. त्यामध्ये संपूर्ण कंटेनर भरलेला गुटखा आढळून आला. पोलिसांनी कंटेनरसह संबंधित दोघांना ताब्यात घेऊन तळबीड पोलीस ठाण्यात आणले. तेथे पहाटेपासून मंगळवारी सायंकाळपर्यंत गुटख्याची तपासणी करण्याची कार्यवाही सुरू होती. यामध्ये सुमारे 84 लाखांचा गुटखा पोलिसांनी जप्त केला आहे. तसेच कंटेनरसह दोघांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्यावर गुन्हा नोंद करण्याची कार्यवाही मंगळवारी रात्री उशिरापर्यंत सुरू होते.
पोलीस अधीक्षक समीर शेख; अप्पर पोलीस अधीक्षक बापू बांगर तसेच कराडचे पोलीस उपाधीक्षक डॉ. रणजीत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल वरुटे, पोलीस कर्मचारी ओंबाशे व पोलीस पथकाने ही कारवाई केली.
महाराष्ट्रात गुटख्यावर बंदी असतानाही मोठ्या प्रमाणावर वाहतूक व विक्री केली जात असल्याची माहिती सपोनि राहुल वरुटे यांना मिळाले होते. त्यांना खास बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार गुटका वाहतूक करणारे कंटेनर हे महामार्गावरून प्रवास न करता महामार्गावर असलेले टोल नाके चुकवत पर्यायी मार्गाने जात असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार राहुल वरुटे यांनी टोलनाक्यावर नाकाबंदी न करता सह्याद्री कारखान्याजवळ कराड-मसूर रस्त्यावर नाकाबंदी केली व त्यांनी लावलेल्या सापळ्यात गुटख्याचा कंटेनर अलगदपणे अडकला.
0 Comments