अपहरण करून व्यापाऱ्याचा खून

 


गोकाक : येथील व्यापारीराजेश झंवर यांच्या अपहरणाची तक्रार कुटुंबीयांनी शुक्रवारी पोलिसांत केली होती; मात्र डॉक्टर मित्राने अपहरणानंतर खून करून त्यांचा मृतदेह गोकाकनजीकच्या कालव्यामध्ये टाकून दिल्याचा संशय व्यक्त होत आहे.

गोकाक पोलिसांनी कालव्यातून वाहणारे पाणी बंद करून तपासकार्य हाती घेतले आहे.

गोकाक येथील व्यावसायिक राजेश सत्यनारायण झंवर (वय 53) यांचे अपहरण झाल्याची तक्रार त्यांच्या कुटुंबीयांनी केली होती; मात्र पोलिसांनी ते बेपत्ता असल्याची नोंद केली होती. राजेश झंवर यांच्या पत्नीने गोकाक शहर पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत पती राजेश यांचे त्यांच्या डॉक्टर मित्रानेच पैशाच्या देवाणघेवाणीतून अपहरण केल्याचा संशय व्यक्त केला होता. गोकाक शहर पोलिसांनी याप्रकरणी संशयित डॉक्टरसह त्याच्या एका साथीदारास अटक करून न्यायालयासमोर हजर केले असता अधिक तपासासाठी त्यांना पोलिस कोठडी देण्यात आली आहे. या प्रकरणातील आणखी तीन आरोपी फरार असल्याचे समजते.

या घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलिसप्रमुख संजीव पाटील यांनी गोकाकचे डीवायएसपी व सीपीआय यांच्यासह मृतदेह फेकलेल्या कालव्याच्या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली. पत्रकारांना माहिती देताना ते म्हणाले, या प्रकरणातील प्रमुख संशयित पोलिस कोठडीत असून मृतदेहाचे शोधकार्य हाती घेण्यात आले आहे. 300 मीटरपेक्षा अधिक कालव्यात तपास केला आहे. मात्र, मृतदेह अद्याप हाती लागलेला नाही. राजेश झंवर यांचा मृतदेह मिळाल्यानंतरच पुढील कारवाई करण्यात येणार आहे. याप्रकरणी दोन डीवायएसपी व उपनिरीक्षक पोलिस तपास करीत आहेत.

कालव्याशेजारी रक्ताचे डाग दिसून आले असून या खून प्रकरणाबद्दल नागरिकांत चर्चा आहे. संशयित डॉक्टरला कोल्हापुरातील एका व्यक्तीने एक बंदुक विकली असल्यामुळे कोल्हापूरचे पोलिस संशयिताला अटक करण्यासाठी आले होते. पण, गोकाक पोलिसांनी संशयितावर गुन्हा दाखल असल्यामुळे त्याला त्यांच्या ताब्यात दिले नाही. त्याच बंदुकीने मित्र राजेशचा गोळी घालून खून केल्याची चर्चा आहे.


Post a Comment

0 Comments