बापाच्या दारू पिण्याच्या सवयीला वैतागून पोटच्या मुलांनीच केली बापाची हत्या

 


औरंगाबादमध्ये बाप लेकांच्या नात्याला काळिमा फासणारी घटना घडली आहे. यामध्ये वडील नेहमी दारू पिऊन येतात, शिवीगाळ करतात, मारहाण करतात या रोजच्या त्रासाला कंटाळून दोन तरुण भावंडांनी स्वःताच्या जन्मदात्या बापाची दगड व लोखंडी गजाने वार करून हत्या केली आहे.

यानंतर मुतदेहावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न देखील केला. हि धक्कादायक घटना औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील धोंदलगाव शिवारामध्ये घडली आहे. या हत्येप्रकरणी वैजापूर पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करून दोन्ही मुलांना अटक केली आहे. 


नारायण रुस्तम वाघ असे या प्रकरणातील मृत व्यक्तीचे नाव आहे तर शुभम नारायण वाघ आणि विकास नारायण वाघ अशी आरोपी मुलांची नावे आहेत. मृत नारायण वाघ हे पत्नी, दोन मुले व कुटुंबातील अन्य सदस्यांसह वैजापूर तालुक्यातील धोंदलगाव शिवारातील गोपालेश्वर मंदिर परिसरातील शेतवस्तीवर राहत होते. नारायण रुस्तम वाघ यांना दारूचे मोठ्या प्रमाणात व्यसन होते. त्यामुळे त्यांचे नेहमी मुलांसोबत, कुटुंबियांसोबत वाद व्हायचे. घटनेच्या दिवशीदेखील ते असेच दारू पिऊन घरी आले आणि त्यांनी घरात शिवीगाळ आरडाओरड करण्यास सुरुवात केली.

यादरम्यान मुलांचा आणि जन्मदात्या बापाचा मोठ्या प्रमाणात वाद झाला. हा वाद सुरू असतानाच परिसरातील नागरिकांनी घटनेची माहिती पोलीस पाटलांना दिली. जेव्हा पोलीस पाटील घटनास्थळी आले तेव्हा त्यांना नारायण वाघ हे मृतावस्थेत दिसले. वडील नारायण वाघ हे नेहमीच दारू पिऊन त्रास देत होते. एवढेच नव्हे तर घरातील सर्वच सदस्यांना शिवीगाळ करून मारहाण करायचे. त्यामुळे रागाच्या भरात त्यांच्या डोक्यात दगड व लोखंडी गजाने मारहाण त्यांची हत्या केली आणि नंतर मृतदेहावर पेट्रोल टाकून जाळल्याची कबुली आरोपी मुले शुभम आणि विकास वाघ यांनी पोलिसांना दिली. पोलीस पाटलांनी दिलेल्या फिर्यादीवरून दोन्ही मुलांविरुध्द वैजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांना अटक करण्यात आली आहे.वैजापूर पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.


Post a Comment

0 Comments