नगर: केडगावात गोळीबाराचा थरार, एकाची हत्या

 


नगर : केडगाव शिवारातील हॉटेल के-9 जवळ एकाची पिस्टलने गोळी घालून हत्या करण्यात आली आहे. गुरुवारी (दि.23) रात्री साडेदहा ते साडेअकरा वाजेच्या दरम्यान ही घटना घडली.

दोघे नातेवाईक अंधारात दारु पित असताना अनोळखी तीन इसम तेथे आले व पैशांची मागणी करत एकाला गोळी घातली. लुटमारीच्या उद्देशातून घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज असून, आरोपींच्या शोधासाठी चार पथके रवाना करण्यात अली आहेत. अरुण नाथा शिंदे (रा.नेप्ती, ता.नगर) यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवाजी किसन ऊर्फ देवा होले (रा.जाधव पेट्रोल पंपाजवळ, कल्याण रोड, नगर) असे मयताचे नाव आहे. शिवाजी होले व त्यांचे नातेवाईक अरुण शिंदे हे केडगाव बायपास रस्त्यावरील हॉटेल के-9 जवळ अंधारात मद्यपान करत होते.

तेथे दोन अनोळखी इसम पायी चालत आले व म्हणाले की, आम्ही येथे दारु पिवू का, त्यावर शिवाजी होले व अरुण शिंदे म्हणाले की, आम्ही नेप्तीचे आहोत, तुम्ही बिनधास्त दारु प्या. त्यानंतर दोघेही काही न बोलता तेथून निघून गेले. काही वेळाने तीन जण परत त्या ठिकाणी आले. त्यातील एकाने अरुण शिंदे यांच्या गळ्याला चाकू लावत पैशांची मागणी केली. शिवाजी होले तेथून पळाले असता तिघांपैकी एकाने हातातील पिस्टलातून होले यांच्यावर गोळी झाडली. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर अरुण शिंदे यांच्या मानेला चाकू लावून तीन हजार रोख व त्यांचा मोबाईल घेऊन तिघेही दुचाकीवरून पसार झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

एसपींची घटनास्थळी भेट
शूटआऊटची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिस अधीक्षक राकेश ओला यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. तसेच अपर पोलिस अधीक्षक प्रशांत खैरे, पोलिस उपअधीक्षक अनिल कातकाडे, एलसीबीचे निरीक्षक अनिल कटके, कोतवालीचे निरीक्षक संपत शिंदे आदींनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली.

हत्येमागे दुसरे कारण ?

लुटमारीच्या इराद्याने हत्याकांड घडल्याचे बोलले जात असले तरी यामागे दुसरे कारण असल्याची चर्चा शहरात सुरू झाली आहे. घटनास्थळावरून पोलिसांना एक काडतूस मिळाले असून, हत्यारांचे धागेदोरे लावले जात आहेत.


Post a Comment

0 Comments