मोठया भावाकडून धाकट्याचा खून

 


वारंवार होणाऱ्या वादावादीचे पर्यावसान मारामारीत होऊन मोठ्या भावाने सख्ख्या धाकट्या भावाचा खून केला आहे. बेकवाड (ता. खानापूर) गावाजवळील बाळेकोडल शिवारात हा प्रकार घडला.

यल्लाप्पा शांताराम गुरव (३५) रा. वेकवाड ता. खानापूर असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. त्याचा मोठा भाऊ राजू शांताराम गुरव याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यल्लाप्पा व त्याचा मोठा भाऊ राजू या दोघांनी गावापासून काही अंतरावर असलेल्या आपल्या शेतात घर बांधले आहे. कुटुंबासमवेत ते त्याच ठिकाणी राहतात. दारूचे व्यसन आणि शेतजमिनीवरून यल्लाप्पाचे वारंवार भावाशी भांडण होत असे. त्यामुळे त्याची पत्नीही माहेरी गेली होती. सततच्या भांडणामुळे यल्लाप्पाचे वृद्ध वडीलही मुलीकडे वास्तव्याला आहेत.

बुधवारी रात्री दोघा भावांमध्ये पुन्हा वाद झाला. यावेळी यल्लाप्पाने मोठा भाऊ राजू याच्यावर कोयत्याचा हल्ला केला. तो काहीच ऐकण्याचा मनस्थितीत नसल्याने राजू यानेही त्याला प्रतिकार केला. रागाच्या भरात राजूने काठीने यल्लाप्पाच्या डोक्यात जोरदार प्रहार केल्याने प्रचंड रक्तस्त्राव होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला.


Post a Comment

0 Comments