शाब्दिक बाचाबाचीतून मित्राची १४ वार करून हत्या

 


रागाच्या भरात मित्राची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना मानखुर्दमध्ये घडली. शाब्दिक बाचाबाचीतून हे प्रकरण मारामारीपर्यंत पोहोचले अन् कोयता आणि तलवारीचे तब्बल १४ वार करत मित्राची हत्या केली.

याप्रकरणी मानखुर्द पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला असून ४ अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे.

मानखुर्द परिसरात राहणाऱ्या बिस्मिलाह मेहबुब शेख (वय ५५) यांच्या तक्रारीवरून पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत. तय्यब अझहर खान असे मृत मुलाचे नाव आहे. त्याच्या डोक्यात, मानेवर आणि हातावर १४ वार करण्यात आले. खानची आई दुबई येथे घरकाम करण्याची नोकरी करते. वडील हे त्यांच्यापासून वेगळे झाले आहेत. त्यामुळे तो आजीकडे राहण्यास होता. तय्यब आणि आरोपींना नशेचे व्यसन होते.

 मानखुर्द लल्लुभाई कंपाऊंड येथील एका कॉन्व्हेन्ट शाळेच्या शेजारी असलेल्या पडक्या शौचालयात ते नशापानी करण्यासाठी बसले होते.
 ४ जानेवारी रोजी सायंकाळी ६ ते ५ जानेवारी दुपारी २ च्या दरम्यान ही घटना घडली. तय्यब हा नेहमीप्रमाणे नशापानी करण्यासाठी बसला होता.
 यादरम्यान आधीच्या भांडणातून किरकोळ शाब्दिक बाचाबाची झाली. याच रागात चौकडीने त्याच्यावर नशेत कोयता, तलवारीने वार केले. गुरुवारी त्याचा मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली. तय्यबचा मृतदेह शवविच्छेदनासाठी राजावाडी रुग्णालयात पाठविला.
 खबऱ्यांच्या मदतीने पोलिसांनी चौकडीला ताब्यात घेतले. त्यांच्या चौकशीत वरील घटनाक्रम उघडकीस आला आहे.
 किरकोळ वादातून हत्या झाल्याचे मानखुर्द पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक महादेव कोळी यांनी सांगितले.


Post a Comment

0 Comments