हनुमान मंदिरात गेला आणि.... कोळसा खाण अधिकाऱ्याच्या मृत्यूने खळबळ

 


चंद्रपूर  शहरात कोळसा खाण अधिकाऱ्याने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. चंद्रपूर शहरातील महाकाली कॉलरी परीसरात असलेल्या हनुमान मंदिरात अधिकाऱ्याचा गळफास लावलेल्या अवस्थेतेतील मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे.

गेल्या वर्षी या अधिकाऱ्याला लाच घेताना केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) ताब्यात घेतले होते.

महाकाली कॉलरी परिसरातील हनुमान मंदिरात अधिकाऱ्याचा गळफास घेतलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली. दिनेश कुमार कराडे असे मृत अधिकाऱ्याचे नाव असून ते चंद्रपूर वेकोली महाप्रबंधक कार्यालयात कार्यरत होते. चंद्रपूर जिल्ह्यात चंद्रपूर डीआरसी माइन-3, वेस्टर्न कोल माईन्स  येथे दिनेश कुमार कराडे व्यवस्थापक म्हणून काम पाहत होते. या घटनेची माहिती मिळताच शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी पंचनामा करुन मृतदेह शवविच्छेदनसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठवण्यात आला. दिनेश कुमार कराडे यांनी ही आत्महत्या कोणत्या कारणामुळे केली हे अद्याप कळू शकले नाही. या प्रकरणाचा पुढील तपास शहर पोलीस करीत आहे .

दरम्यान, ऑक्टोबर 2022 मध्ये सीबीआय नागपूरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेड (डब्ल्यूसीएल) चे अधिकारी दिनेश कराडे यांनी डब्ल्यूसीएलच्या कर्मचाऱ्याकडून 5 हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले होते. सुटीच्या दिवशी केलेल्या कामाच्या मजुरीच्या बदल्यात एका मजुराकडे दिनेश कराडे यांनी लाच मागितली होती. सुट्टीच्या दिवशी काम केल्याने मजुराला दुप्पट तिप्पट पैसे मिळाले होते. दिनेश कराडे यांच्याकडेच मजुरांच्या कामाचे नियोजन करण्याची जबाबदारी असल्याने त्यांनी या मजुराकडे लाच मागितली. तक्रारदार मजूराने 9 सुट्ट्यांच्या दिवशी काम करण्याची संधी मिळाली होती. त्याबदल्यातच कराडे यांनी लाच मागितली होती. तक्रार मिळाल्यानंतर सीबीआयने दुर्गापूर खाण परिसरात कारवाई करत कराडे यांना लाच स्विकारताना अटक केली होती.

यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. नागपूर येथील सीबीआय अधिकारी सलीम खान यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली होती. पुढील तपास सुरू असतानाच कराडे यांच्या आत्महत्येची बातमी समोर आली आहे.


Post a Comment

0 Comments