सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेने उचलले टोकाचे पाऊल

 


लग्न म्हणजे दोन जणांचे मिलन. जोडीदारांनी एकमेकांच्या साथीने संपूर्ण आयुष्य काढणे. असेच स्वप्न लातूरमधील सायलीने पहिले होते.

पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळेच होते. तिचा आनंद फक्त 6 महिनेच टिकला. लग्नाच्या 6 महिन्यानंतर सासरच्यांनी तिची छळवणूक करण्यास सुरुवात केली. तिला सासरचे लोक कोणत्या ना कोणत्या कारणावरून सतत टोमणे मारत होते. अखेर या त्रासाला कंटाळून सायलीने आपल्या आयुष्याचा शेवट केला. 

लातूर जिह्यातील चिंचोली या ठिकाणी हि धक्कादायक घटना घडली आहे. सायली दत्ता कांबळे असे आत्महत्या करणाऱ्या मृत विवाहित महिलेचे नाव आहे. मृत सायलीचा लातूर जिह्यातील जळकोट तालुक्यात असणाऱ्या चिंचोली येथील दत्ता भानुदास कांबळे यांच्यासोबत 2018 मध्ये विवाह झाला होता. लग्नानंतर 6 महिने तिचे सुखात गेले. मात्र त्यानंतर तिच्या सासरच्यांनी आपले रंग दाखवण्यास सुरुवात केली. 

कधी तिला टोमणे मारू लागले तर कधी पैशांसाठी शिवीगाळ आणि मारहाण करू लागले. 'तुला स्वयंपाक येत नाही. तू आम्हाला पसंत नाही', असे टोमणे मारुन 'रिक्षा घेण्यासाठी 80 हजार रुपये माहेरहून घेऊन ये' असे म्हणत तिचा छळ करण्यास सुरुवात केली. सायली आज ना उद्या परिस्थिती सुधारेल या आशेवर राहू लागली. माहेरच्या मंडळींनी एखादे लेकरु झाल्यानंतर सासरचा छळ कमी होईल, अशी समजूत घातली. सा यलीने हा त्रास तसाच सहन केला. मात्र हा त्रास कमी होण्याऐवजी वाढत गेल्याने सायलीने अखेर वैतागून राहत्या घरात साडीच्या साहाय्याने पंख्याला गळफास घेऊन आपल्या आयुष्याचा शेवट केला.

या प्रकरणी सायलीच्या वडिलांनी जळकोट पोलीस ठाण्यात सायलीचा पती दत्ता भानुदास कांबळे,
सासू तुळसाबाई भानुदास कांबळे, सासरा भानुदास कांबळे,
दीर दीपक भानुदास कांबळे आणि जाऊ भाग्यश्री दीपक कांबळे या पाच जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
जळकोट पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.


Post a Comment

0 Comments