मोटारीच्या वादातून हवेत गोळीबार

 


वापरण्यास घेतलेली मोटार परत करण्यास गेलेल्या पाच जणांवर मोटार मालकाने बंदूक रोखून हवेत गोळीबार केल्याची घटना नाशिमधील इंदिरानगर बोगद्यासमोरील साईनाथ चौफुली परिसरात घडली. आर्थिक व्यवहारातून हा वाद झाल्याची चर्चा आहे.

याबाबत अविनाश टिळे (२७, धात्रकफाटा) या युवकाने तक्रार दिली. सुनील चोरमारे (३५, राणेनगर), जग्गू सांगळे आणि राज जोशी अशी संशयितांची नावे आहेत.

टिळे यांनी चोरमारे यांची मोटार वापरण्यासाठी घेतली होती. रात्री ही गाडी परत देण्यासाठी टिळे आपले मित्र विनोद गोसावी, यश शिंदे, भूषण देशमुख आणि युवराज सोनवणे आदींना घेऊन इंदिरानगर बोगद्यासमोरील साईनाथ चौफुली भागात गेले होते. सी. के मोटार गॅरेजसमोर उभा असलेला मोटार मालक चोरमारे आणि अन्य दोघांनी टिळे यांच्यासह त्यांच्या मित्रांना शिवीगाळ केली. यावेळी चोरमारेने बंदूकीतून हवेत गोळीबार करीत तुम्हाला आता जिवंतच सोडत नाही, अशी धमकी दिली. संशयिताने अंगावर धाऊन जात बंदूक रोखत गोळीबार करण्याचा प्रयत्न केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


Post a Comment

0 Comments