मैदानात खेळताना काळाचा घाला, वडीलांसमोरच मुलाचा मृत्यू

 


यवतमाळ : काळ कसा चालून येईल याचा नेम नाही. वडिलांसोबत घराजवळच्या खुल्या मैदानात खेळत असलेल्या बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला.

सात वर्षांचा बालक शाळेच्या ऑटोची वाट पाहत घराबाहेर खेळत होता. त्याचे वडील बाकड्यावर बसून पेपर वाचण्यात गुंग होते. मुलगा वडिलांची खोड काढून नामफलक असलेल्या भिंतीमागे लपाछपी खेळत होता. त्याच्या वडिलांनी जा शाळेची वेळ झाली, मस्ती करू नको असे म्हणत पेपर वाचण्यात ते गुंग झाले. दुसऱ्याच मिनिटाला शेजारी तेथे धावून आले. तेव्हा त्यांना अघटित घडल्याचे लक्षात आले. क्षणात चिमुकला हातचा गेला.

विहान अमोलराव श्रीवास (७) असे मृत बालकाचे नाव आहे. तो इयत्ता दुसरीत आहे. बुधवारी सकाळी शाळेत जाण्यासाठी गणवेश घालून विहान तयार झाला. त्याचा ऑटोरिक्षा यायला अवकाश असल्याने तो मैदानात बसून पेपर वाचत असलेल्या वडिलांशी खेळू लागला. विहानने मैदानातीलच नामफलकाच्या भिंतीचा आडोसा घेऊन वडिलांकडे गंमत म्हणून दगड भिरकावला व पुन्हा लपून बसला. यातच त्याचा घात झाला. नामफलकाची भिंत अचानक कोसळली.

ही भिंत खेळत असलेल्या विहानच्या अंगावर पडली. यात त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. काही क्षणातच ही घटना घडली. घटनेनंतर आजूबाजूला असलेल्या नागरिकांनी तेथे धाव घेतली. वडील काही फुटावरच पेपर वाचत होते. नागरिकांच्या धावपळीने त्यांचे लक्ष या घटनेकडे गेले. रक्ताच्या थारोळ्यात विहानला शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, वजनदार भिंत कोसळल्याने विहानच्या डोक्याचे दोन भाग झाले होते. यात त्याचा मेंदूच बाहेर पडला होता. अशा अवस्थेत त्याला रुग्णालयात नेल्यानंतर डाॅक्टरांनी लगेच मृत घोषित केले. या घटनेने श्रीवास कुटुंबीयांसह परिसरातील नागरिकही हादरून गेले. संपूर्ण परिसरात शोककळा होती. दरम्यान, मैदानासह शहरातील बगीच्यामधील सुरक्षेचा मुद्दाही या घटनेमुळे ऐरणीवर आला आहे. पालिका प्रशासनाने बगीच्यातील खेळणी सुरक्षित आहेत का? याची तपासणी करण्याची मागणी होत आहे.


Post a Comment

0 Comments