चिमुरडीवर अत्याचार, केली हत्या

 


भिवंडी - शांतीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नागाव परिसरात तीन वर्षाच्या चिमुरडीचे अपहरण व अत्याचार करून तिची हत्या केल्याची घटना मंगळवारी राष्ट्रीय बालिका दिनाच्या दिवशी घडली आहे.

विशेष म्हणजे रविवारी काटई गावातील चिमुरडीचा अपहरण करून तिच्यावर लैंगिक अत्याचार करून हत्या केल्याची घटना ताजी असतानाच अवघ्या तीन दिवसात भिवंडी पुन्हा एकदा या घटनेने हादरली असून या घटनेने सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे.

शहरातील नागाव भागातील एका चाळीत दुर्दैवी मुलगी आपल्या आई वडील व दोन भावंडांसह राहत होती.वडील भंगार फेरीवाला व्यवसाय करणारा असून आई मजुरीचे काम करते.दोन महिन्या पुर्वी मुलीचे आई वडील तीन मुलांसह या ठिकाणी राहायला आले होते.घरात तीन वर्षीय मुलीसह पाच व सहा वर्षांच्या दोन मुलांना घरात ठेऊन मंगळवारी आई वडील सकाळी कामावर गेले होते.दुपारी एक वाजता महिला घरी आली.त्यावेळी तीन वर्षीय मुलगी आढळून न आल्याने तिने परिसरात तिचा शोध घेतला मात्र ती न सापडल्याने अखेर सायंकाळी आठ वाजता महिलेने शांतीनगर पोलीस ठाण्यात मुलीच्या हरवल्याची तक्रार दिली.

पोलिसांनी सुरुवातीला अपहरणाचा गुन्हा दाखल करून चिमुरडीचा शोध घेतला मात्र मुलगी सापडली नाही,त्यांनतर बुधवारी सकाळी त्याच परिसरातील एका चाळीच्या पहिल्या मजल्यावरील अडगळीच्या खोलीत चिमुरडीचा मृतदेह आढळून आला.शांतीनगर पोलिसांनी फरार आरोपीचा शोध घेण्यासाठी झडती सत्र सुरू केले असून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मुंबईतील जे जे रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.

आरोपीच्या शोधासाठी विशेष पथके तैनात करण्यात आली असून चाळीत राहणाऱ्या कुटुंबियांची माहिती चाळ मालकांनी जवळच्या पोलीस ठाण्यात देणे बंधनकारक असून माहिती न देणाऱ्या चाळ मालकांवर पोलीस विभागातर्फे कारवाई करण्यात येईल अशी माहिती पोलीस उपायुक्त नवनाथ ढवळे यांनी दिली आहे.


Post a Comment

0 Comments