संक्रांतीचे वाण देण्यासाठी निघालेल्या महिलेचा अपघातात मृत्यू

 


संक्रांतीचे वाण देण्यासाठी पैठण तालुक्यातील बोरगाव येथील महिला नाथांच्या व गोदावरीच्या दर्शनासाठी पैठणला रिक्षातून जात होत्या. यावेळी पैठण -औरंगाबाद रस्त्यावर कातपूर फाट्याजवळ रिक्षा पलटी होऊन शालुबाई सोनाजी हिवराळे (वय ६५) यांचा मृत्यू झाला.

घटना आज (दि.१५) सकाळी अकराच्या सुमारास घडली. संक्रांती सणाच्या दिवशीच काळाने घाला घातल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

याबाबत एमआयडीसी पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, बोरगाव येथील शालुबाई हिवराळे संक्रांतीच्या सणानिमित्त वाण देण्यासाठी बोरगाव येथून पैठणकडे जात होत्या. यावेळी कातपूर फाट्याजवळ रिक्षा पलटी झाल्याने त्या गंभीर जखमी झाल्या. त्यांना पैठण येथील शासकीय वैद्यकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना तपासून मृत घोषित केले.

अपघाताची माहिती कळताच एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भागवत नागरगोजे, बीट जमादार राहुल मोहतमल, कर्तारसिग सिंघल यांनी रुग्णालयात धाव घेतली. शालुबाई हिवराळे यांची घरची परिस्थिती अत्यंत बिकट आहे. त्या दर महिन्याच्या एकादशीला पैठणच्या नाथांच्या दर्शनाला जात असत. संक्रांत सणानिमित्त संक्रांतीचे वाण देण्यासाठी पैठणला जात असताना त्यांच्यावर काळाने घाला घातल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

Post a Comment

0 Comments