कामावरून घरी आले , दुपारी जेवण उरकून झोपले ते पुन्हा उठलेच नाहीत

 


नेहमीप्रमाणे कामावरुन घरी परत आल्यानंतर दुपारी जेवणातून विष घेऊन जोडप्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण येथे घडली आहे.

संजय सदा निकम आणि सोनाली संजय निकम अशी आत्महत्या करणाऱ्या पती-पत्नीचे नाव आहे. याप्रकरणी शिरगाव पोलीस ठाण्यात आत्महत्येची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, या जोडप्याने आत्महत्या का केली याबाबत अद्याप माहिती मिळू शकली नाही. शिरगाव पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत. चिपळूण तालुक्यातील अलोरे चेंबरी या ठिकाणी हा धक्कादायक प्रकार घडला आहे.

संजय निकम याच्या पहिल्या पत्नीचा मृत्यू झाल्यानंतर त्याने सोनाली हिच्याशी प्रेमविवाह केला होता. दोघेही मोलमजुरी करुन आपला उदरनिर्वाह चालवत होते. काल दुपारी नेमहीप्रमाणे दोघेही मजुरीचे काम करून आपल्या घरी आले होते.

घरी आल्यानंतर जेवणातून विष घेऊन ते झोपी गेले होते, असा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. सायंकाळी घरामधील बकऱ्या चरायला घेऊन गेलेली आजी घरी परतल्यानंतर त्यांनी या दोघा नवरा-बायकोला झोपेतून उठवण्याचा प्रयत्न केला.

परंतु ते कोणताच प्रतिसाद देत नसल्याने त्यांनी आजूबाजूच्या लोकांना बोलावलं. यावेळी पती-पत्नी मयत असल्याचं कळलं. यानंतर पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. पोलिसांकडून सदर घटनेचा तपास सुरू झाला आहे.

पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत दोन्ही मृतदेह ताब्यात शवविच्छेदनासाठी कामथे रुग्णालयात पाठवले. दरम्यान, या पती-पत्नीने हे टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या करण्यामागचं नेमकं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. आत्महत्या प्रकरणाची चौकशी रत्नागिरी पोलीस करीत आहेत.

दररोज मजुरीला जायचं. रोजच्या रोज पैसे कमवायचे आणि उदरनिर्वाह चालवायचा असा रोजचाच निकम परिवाराचा दिनक्रम होता. काल दुपारी पती-पत्नीच्या बाबत जे घडलं ते पाहून सर्वांनाच धक्का बसला आहे.

Post a Comment

0 Comments