सुनेन मारलं, रस्त्यावर आपटलं आणि छातीवर बसली, सासरेबुवांचे सनसनाटी आरोप

 


कानपूरमध्ये सून आणि सासऱ्यांच्या नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. एका लालची महिलेनं आपल्या सासऱ्यांना अमानुष मारहाण केली. या मारहाणीचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे.

याप्रकरणी आता मारहाण झालेल्या पीडित सासऱ्यांनी सूनेवर गंभीर आरोप केले आहे. मारहाण करण्यात आलेल्या व्यक्तीचं नाव अरुण कुमार तिवारी असं आहे. ते कानपूरच्या काकादेव इथं राहायला आहे. अरुण तिवारी यांना दोन मुलं आहे. अरुण कुमार यांचं स्वतःचं घर असून त्यांची दोन्ही मुलंही तिथेच राहतात.

अरुण तिवारी निवृत्त झाल्यानंतर त्यांना 10 लाख रुपये मिळाले होते. आपल्या निवृत्तीच्या पैशांवर सूनेची वाईट नजर असल्याचा आरोप तिवारी यांनी केला आहे. 10 लाख रुपये आणि माझं घर आपल्या नावावर करुन घेण्यासाठी सूनेनं मला मारहाण केली असल्याचा आरोप अरुण तिवारी यांनी केला आहे.

पैसे आणि घरांना घेऊन सून मला छळते. 8 तारखेला तिने माझ्याकडे 10 रुपयांची मागणी केली होती. मी तिला पैसे देण्यास नकार दिला म्हणून तिने मला बोलावून भर रस्त्यात चारचौघांसमोर अमानुष मारहाण केली. इतकंच नाही, तर रस्त्यावर मला आपटल्यानंतर ती माझ्या छातीवरच बसली. नंतर माझा मोबाईलही तिने फोडला, असं अरुण तिवारी यांनी म्हटलंय.

अरुण तिवारी यांनी एका संकेतस्थळाला दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या सुनेचं नाव अर्चना असं आहे. अर्चना घरातही दादागिरी करते, असा आरोप त्यांनी केलाय. एका वर्षापूर्वीही तिने आपल्याला मारहाण केली होती, असं तिवारी यांनी म्हटलंय. घरातील सीसीटीव्हीदेखील अर्चनाने फोडल्याचा आरोप तिवारी यांनी केला आहे. अर्चनाविरोधात आपण पोलिसांत तक्रारही दाखल केली आहे, पण अद्याप कोणताही कारवाई करण्यात आली नसल्याचंही तिवारी यांनी म्हटलं.

आता अरुण तिवारी यांनी दिलेल्या तक्रारीनंतर आणि मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. समोर आलेले व्हिडीओ, सासऱ्यांचं म्हणून आणि इतर नातलगांच्या चौकशीतून योग्य ती कारवाई संशयित आरोपीवर केली जाईल, असं पोलीस अधिकाऱ्यांनी म्हटलंय. ही घटना समोर आल्यानंतर कानपूरमध्ये खळबळ माजलीय.


Post a Comment

0 Comments