आईला मुलांनीच घातला 46 लाखांचा गंडा

 


  पुणे : कधीही साधी विचारपूस न करणाऱ्या मुलांनी आईला माहेरहून पैसे मिळाल्यानंतर तिच्याकडे धाव घेऊन न्यायालयीन कामकाजाचा बहाणाकरून सह्या घेत ४६ लाख रुपये बँक खात्यातून परस्पर काढून फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तर आईच्या घराचे पाणी व लाईट बंद करुन तिचा सांभाळ करण्यास नकार दिला आहे.

  याप्रकरणी एका ८२ ‌वर्षीय ज्येष्ठ महिलेने मुंढवा पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार बाळासाहेब मारूती टिळेकर, मिलिंद मारूती टिळेकर, सुनिता बाळासाहेबत टिळेकर, स्वाती बाळासाहेब टिळेकर, स्वाती मिलिंद टिळेकर आणि नात यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार १६ एप्रिल २०१२ ते ५ डिसेबर २०२२ या कालावधीत घडला आहे. तक्ररादार यांच्यावतीने अ‍ॅड. स्मिता पाडोळे यांनी काम पाहिले आहे.

  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार केशवनगरमधील एका वाड्यात एकट्याच राहतात. त्यांना चार मुले आहेत. त्याचा सर्वात मोठा मुलगा बाळासाहेब, दुसरा सुनिल तिसरा मिलिंद तर लहान मुलगा चंद्रशेखर आहे. त्यांची मुले विचारपूस देखील करत नसत.पण, त्यांना आईला माहेरकडून पैसे मिळाणार आहेत, अशी माहिती समजली. त्यानंतर मात्र, त्यांच्या आईकडे चकरा वाढू लागल्या. तिच्या विषयी त्यांच्या मनात प्रेम निर्माण झाले. आता आई म्हटल्यानंतर तिच्या मायेचा बांध पुन्हा वाहू लागला. पण, मुलांच्या मनातच खोट होती. मोठ्या मुलाने माझे घर रिकामे पडले आहे, ते घर तुला देतो तिथे कायमची रहा, मी ते घर तुझ्या नावावर करतो, अशी बतावणी केली. त्यानंतर आई त्यांच्याकडे तबल १२ वर्ष राहत होती.

  एप्रिल २०१२ मध्ये कोर्टाच्या आदेशाने आईच्या खात्यावर मिळकतीचे ६० लाख रूपये जमा झाले. त्यानंतर १६ एप्रिल २०१२ कोर्टाबाहेर आल्यावर मुलांनी आईच्या कोर्टाच्या कामानिमित्त कागदावर सह्या घेतल्या. त्यानंतर त्यांनी पैशाकडे पाहिले नाही. पण, २०१५ मध्ये त्यांना अ‍ॅटॅक आला. त्यासाठी अडीच लाख रूपये भरण्यासाठी बँक खात्याचा धनादेश दिला. तेव्हा त्यांना त्यांच्या खात्यातून कोणीतरी ४६ लाख काढले असे समजले. हे पैसे मुलांनी काढल्याचे समजले. त्यांनी पैसे परत मागितले असता पैसे परत मिळणार नाही असे सांगितले.

  तर, महिन्याला लाईट बिलाचे ५०० रूपये देऊनही ते भरले नाही. त्यामुळे त्यांची लाईट देखील कापावी लागली. पाणी पट्टी देखील न भरल्याने पाणीही बंद झाले. तर आई निघून जावी यासाठी पत्र्याच्या घरात राहण्यास सांगितल्याचे तक्रारीत म्हटले आहे. पण, जोपर्यंत पैसे परत देणार नाही तोपर्यंत घर सोडणार नसल्याचा पवित्रा त्यांनी घेतला. यादरम्यानच त्यांनी पुणे पोलिसांच्या भरोसासेलकडे तक्रार दिली.

  याबाबत वरिष्ठ निरीक्षक अजित लकडे यांनी सांगितले की, भरोसा सेलच्या ज्येष्ठ नागरिक कक्षाकडून अभिप्राय आला आहे. त्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. दहा वर्षापूर्वी पासून घडत आलेला हा गुन्हा असून, त्यानुसार पुढील तपास सुरू आहे, असे त्यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments