दागिने बनविण्याच्या बहाण्याने सव्वादोन लाखांचे दागिने लंपास

 


भांडी विक्री करणाऱ्या एका महिलेने येथील एका महिलेचा विश्‍वास संपादन करून तुमचे दागिने आवडले असून, अशीच डिझाइन मलाही करायची आहे. तुमचे दागिने द्या, असे सांगत डिजाईन बनविण्याच्या नावाखाली फसवणूक करून दागिने लुबाडल्याचा प्रकार हनुमाननगर येथे घडला.

यामुळे शहरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हनुमाननगर भागात भांडी विक्री करण्यासाठी एक महिला येत होती. सदर महिला नवीन भांडे देऊन जुनी भांडे घेत. याच भागात राहणाऱ्या बेबी भिकाजी शिंदे (वय ६०) या महिलेच्या घरी संशयित महिला जाऊन मी जुनी भांडी घेवून नवी भांडे देते, असे सांगून भांडी विक्री करीत असत 

भांड्यांच्या व्यवहारात दोघींचा एकमेकींवर विश्‍वास बसला. ही बाब हेरून संशयित महिलेने बेबीबाई यांच्या घरी जाऊन तुमचे सोन्याचे दागिने मला आवडले असून, त्याची डिझाइन खूप चांगली आहे. असेच, दागिने मला बनवायचे असून तुमचे दागिने मला द्या, त्यानुसार दागिने घडविते आणि तुम्हाला तुमचे दागिने परत करते, असे सांगितले.

त्यावर बेबीबाई यांनी त्यांच्यावर विश्‍वास ठेवून घरातील सोन्याची पोत, एक नथ, चांदीच्या तोरड्या, चांदीची चैन, कानातील रिंगा, गळ्यातील पान असे एकूण दोन लाख २५ हजार १०० रुपयांचे सोन्या- चांदीचे दागिने सदर महिलेला दिले. त्यानंतर संशयित महिला परतलीच नसल्याने बेबीबाई शिंदे यांनी मनमाड पोलिसात फिर्याद दिली.


Post a Comment

0 Comments