पत्नीवर जादूटोणाकेल्याचा संशय

 


आपल्या पत्नीवर जादूटोणा केल्याच्या संशयावरून एकाने शेजारी राहणाऱ्या युवकास भर चौकात चाकूने भोसकून ठार केले. ही घटना येथील सुभाष चौकात रविवारी रात्री ९.३० वाजताच्या सुमारास घडली.

अमोल तुकाराम धुळे (३५, रा. शिवाजी वॉर्ड) असे मृताचे नाव आहे. रमेश वसंता पवार (३८) असे आरोपीचे नाव आहे. अमोल धुळे व रमेश पवार शिवाजी वॉर्डात शेजारी राहतात. अमोलने आपल्या पत्नीवर जादूटोणा केल्याचा रमेशला संशय होता. रविवारी रात्री अमोल कापड दुकानातून आपले काम आटोपून घरी परत जात होता. सुभाष चौकात रात्री ९.३० वाजताच्या सुमारास रमेशने अमोल याला अडवून चाकूने मांडीवर व गुप्तांगावर सपासप वार केले. यात अमोल जागीच ठार झाला. अमोल धुळे अतिशय मनमिळावू स्वभावाचा व निर्व्यसनी होता. तो एका कापड दुकानात काम करीत होता.

आरोपी रमेश पवार हा घटनेनंतर कपडे बदलून पळण्याच्या तयारीत होता. गोपनीय माहिती वरून पोलिस उपनिरीक्षक राजू खांदवे व त्यांच्या पथकाने एका तासातच आरोपीस शिताफीने पकडले. त्याच्याविरुद्ध अनुसूचित जाती, जमाती प्रतिबंधक कायदा आणि भादंवि कलम ३०२ नुसार गुन्हा दाखल केला. पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी आदित्य मिरखेलकर यांच्याकडे वर्ग करण्यात आला आहे. तपासात निरीक्षक दिनेश शुक्ला यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक राजू खांदवे, हेड कॉन्स्टेबल जलाल शेख, कॉन्स्टेबल सिद्धोधन भगत,आकाश बाभूळकर यांनी महत्त्वाची कामगिरी बजावली.


Post a Comment

0 Comments