शिवसेनेच्या महिला आघाडीच्या शहर संघटक रंजना पौळकर हल्ला प्रकरणात हल्लेखोर आरोपीला पोलिसांनी बिहारमधून अटक केली आहे. या प्रकरणात जिल्हाप्रमुख सुरेश मापारी यांनी तब्बल वीस लाखांची सुपारी ठरवून पंचवीस हजार रुपये दिल्याची बाब पोलिस तपासात समोर आल्याची माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील पुजारी यांनी दिली.
उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या महिला आघाडीच्या वाशीम शहर संघटक रंजना पौळकर यांच्यावर ता.१० नोव्हेंबर रोजी ग्रामीण पोलिस ठाण्यासमोर जिवघेणा हल्ला केला होता. या हल्ल्यात रंजना पौळकर गंभीर जखमी झाल्या होत्या. त्यांना अकोला येथे उपचारासाठी हलविण्यात आले होते. या प्रकरणाचे धागेदोरे राजकीय वर्तुळात पसरले होते.
या प्रकरणात पोलिसांनी ता.२५ नोव्हेंबर रोजी अब्दूल वाजीद, अब्दूल जुबेर, शेख नुर, भगवान शंकर वाकुडकर, नितीन संजय कावरखे यांना अटक केली होती. हे सर्व हल्ला प्रकरणाच्या कटात सामील होते. त्यानंतर या अटकेतील आरोपीची चौकशी केल्यानंतर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुरेश मापारी यांना पोलिसांनी अटक केली होती. हे सर्व आरोपी कटात सामील होते, मात्र हल्लेखोर आरोपी फरार होता. स्थानिक गुन्हे शाखा, वाशीम शहर पोलिस ठाण्यातील कर्मचारी व अधिकारी मुख्य हल्लेखोराचा माग काढत बिहार राज्यात पोचले.
बिहार राज्यातील बिक्रमगंज येथील अटल काशीनाथसिंग यादव याला पोलिसांनी अटक करून वाशीम येथे आणले. या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत सहा आरोपींना अटक केली आहे. या प्रकरणातील जखमी महिलेवर अकोला येथे खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
0 Comments