मृत तरुणाला जिवंत केल्याचा बनाव प्रकरणात भोंदूबाबाला अटक

 


अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यातील विवरा येथील मृत तरुणाला जिवंत केल्याचा बनाव केल्याप्रकरणी भोंदूबाबाला पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून अटक केली आहे. दीपक बोरले असे भोंदूबाबाचे नाव असून त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

पातूर तालुक्यातील विवरा गावात राहणारा प्रशांत मेसरे होमगार्ड सेवेत आहे. तो गेल्या काही दिवसांपासून तणावात व आजारी होता. त्याला गावातील भोंदूबाबा दीपक बोरले (१८) याला दाखवण्यात आले. २६ ऑक्टोबरला प्रशांतला काही नातेवाईक भोंदूबाबा दीपक बोरले याच्यासह बुलढाणा जिल्ह्यात एका मंदिरात दर्शनासाठी घेऊन गेले. दरम्यान, प्रशांत बेशुद्ध पडला. त्याला खामगाव येथील एका डॉक्टरकडे दाखवण्यात आले. पुढील उपचारासाठी अकोल्यात नेत असल्याचे सांगून नातेवाईकांनी त्याला विवारा गावात आणले. प्रशांत बेशुद्ध असल्याने नातेवाईक व भोंदूबाबाने त्याला मृत घोषित केले. रात्री अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमीत घेऊन जात असताना गावकऱ्यांना तिरडीवर हालचाल होताना दिसून आली. गावातील भोंदूबाबा याने त्याला जिवंत करण्याचा दावा केला. मांत्रिकाने मंत्र-तंत्र म्हटले. त्यानंतर प्रशांत उठून बसला. हे वृत्त परिसरात वाऱ्यासारखे पसरले. त्यामुळे प्रशांतला पाहण्यासाठी प्रचंड गर्दी उसळली होती.


Post a Comment

0 Comments