फळांच्या पेट्यात ५०२ कोटींच्या कोकेनचे बॉक्स

 


मुंबई : अमली पदार्थांविरोधातील कारवाई तपास यंत्रणांनी अधिक तीव्र केली असून केंद्रीय महसूल गुप्तचर यंत्रणेच्या (डीआरआय) मुंबई विभागाच्या अधिकाऱ्यांनी तब्बल ५०२ कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त केले आहेत

न्हावाशेवा बंदरातून सफरचंद आणि पेअरच्या पेट्यांमधून या अमली पदार्थांची तस्करी होत होती. त्याचवेळी विभागाच्या अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली. अलीकडेच वाशी येथे परदेशातून आलेल्या संत्र्यांच्या पेट्यांतून विभागाने तब्बल १४७६ कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त केले होते. त्यानंतर ही दुसरी कारवाई झालेली आहे.

फळाच्या एका मोठ्या ऑर्डरच्या माध्यमातून अमली पदार्थांची तस्करी होत असल्याची माहिती अधिकाऱ्यांना मिळाली. त्याच्या आधारे अधिकाऱ्यांनी छापेमारी केली असती, सफरचंद आणि पेअर पदार्थांच्या पेट्यांमध्ये एक किलो वजनाचे कोकेन या पद्धतीने ५० पेट्यांतून ५० किलो कोकेन असल्याचे आढळून आले. संबंधित व्यक्तींवर अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.Post a Comment

0 Comments