सरकार स्थापन होऊन इतके दिवस झाले तरी दोन व्यक्तीच मंत्रिमंडळ चालवत आहेत. आमची सत्ता असताना सात मंत्र्यांवर जबाबदारी होती व त्यांना खातेवाटपही झालं होतं. भाजप मध्ये कायदे तज्ज्ञांची फौज आहे आणि मी जे म्हणतोय ते असत्य ठरणार नाही.
आमदारांच्या व मुख्यमंत्र्यांच्या डोक्यावर अपात्रतेची टांगती तलवार असल्यामुळेच ते आत्तापर्यंत मंत्री मंडळ स्थापन करू शकले नाहीत. असे मत शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले. रविवारी दिल्ली येथे खासगी वृत्तवाहिनीला ते प्रतिक्रिया देत होते. यावेळी ते म्हणाले की शिवसेनेने अपात्रतेसंदर्भात कारवाई सुरु केली असून प्रकरण सर्वोच्च न्यायालयात आहे. अशावेळी या सगळ्यांना मंत्री पदाची शपथ घेण्याचा अधिकार राहिलेला नाही. परंतु आता तुम्ही कायदा तुडवायचाच ठरवलं असेल तर ती तुमची मर्जी. मी हे नैतिकतेच्या आधारावरच सांगत आहे. तुम्ही पक्ष फोडला आणि बाहेर गेलात पण या महाराष्ट्र्रवार राज्य करणे इतकं सोप्पं नाही. असा इशारा यावेळी राऊत यांनी दिला.
40 बंडखोर आमदारांवर खून, बलात्कार, ईडी, भ्रष्टाचार असे सर्व आरोप हे भाजपनेच केले आहेत. त्यामुळे त्यांच्या मांडीला मांडी लावून कसं बसायचं आणि त्यांच्यासोबत भविष्यात निवडणूक कशा लढवायच्या अशा प्रकारच्या गुप्त चर्चा बैठकांमधून होत आहेत. भाजपमध्ये अशी चर्चा करणारा एक मोठा वर्ग आहे. 40 आमदारांपैकी बहुसंख्य आमदार हे मंत्रिपदासाठी गेले आहेत. त्यामुळे परत काही घटनात्मक पेच निर्माण होऊ शकेल का ही भीती त्यांच्या मनामध्ये आहे. म्हणूनच आता अनेक बंडखोर आमदार मुंबईत येऊन शक्तिप्रदर्शन करत आहेत. हे शिवसेनेमध्ये कधीच झालं नव्हतं. असे राऊत म्हणाले.
अभिनेत्री दीपाली सय्यद यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे भेट घेणार असल्याचे वक्तव्य केले होते. याबद्दल राऊत म्हणाले की दीपाली सय्यद यांना अशी वक्तव्य करण्याचे अधिकार कोणी दिले? त्या शिवसेनेच्या पदाधिकारी किंवा कार्यकर्त्या असतील परंतु त्या काही शिवसेनेच्या नेत्या नाहीत. अशा प्रकारची विधानं काळजीपूर्वक करणे गरजेचे असते. अशी विधानं पक्षाचे अधिकृत प्रवक्ते किंवा नेतेच करू शकतात. परंतु त्यांनी एकत्र यावं असं आम्हाला का वाटणार नाही. इतकी वर्षे ते आमचे सहकारी आहेत. आम्ही एकत्र काम केलं आहे. त्यांचे आमचे वैयक्तिक संबंध आपुलकीचे आणि जिव्हाळ्याचे राहिले आहेत. त्यांच्या गटातील अनेक लोकं माझ्यावर टीका करत असले तरी ते सत्तेचे भागीदारच होते. पक्षाचा नेता म्हणून मी त्यांच्यासाठी अनेक वर्षे लढलो आहे. आमच्यावर टीका करणे हा त्यांचा नाईलाज आहे. भाजप त्यांच्या मुखातून आमच्यावर हल्ले करत आहे. असे राऊत म्हणाले.
सोर्स : सामना
0 Comments