बंडखोर आमदाराच्या कार्यालयाची तोडफोड करणाऱ्या शिवसैनिकांवर गुन्हा दाखल

 


शिवसेनेचे बंडखोर आमदार तानाजी सावंत यांच्या पुण्यातील सहकारनगर परिसरातील कार्यालयाची तोडफोड करणाऱ्या शिवसैनिकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आमदार तानाजी सावंत एकनाथ शिंदेच्या गटात सहभागी झाले आहेत.

यामुळे संतप्त झालेल्या शिवसैनिकांनी तानाजी सावंत यांचे पुण्यातील शुगर मिल्सच्या कार्यालयाची तोडफोड केली.

याप्रकरणी नागेश चव्हाण (रा. धनकवडी) यांनी तक्रार दिली आहे. त्यानूसार, दहा ते पंधरा अनोळखी व्यक्तींवर सहकारनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, सहकारनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत तानाजी सावंत यांच्या भैरवनाथ शुगर मिल्सचे कार्यालय आहे. कार्यालयाची जबाबदारी प्रा. सावंत यांचे भाऊ सांभाळतात. तर, तक्रारदार तेथे लेखापाल आहेत. शनिवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास शिवसैनिक सावंत यांच्या कार्यालयात शिरले. त्यांनी सावंत यांच्या धिक्काराच्या घोषणा देत कार्यालयाची तोडफोड केली. त्यामुळे चांगलाच गोंधळ उडाला.

घटनेची माहिती मिळताच सहकारनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सावळाराम साळगावकर आणि पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. तोपर्यंत शिवसैनिक तेथून निघूनही गेले होते. दरम्यान, पोलीसांकडून या शिवसैनिकांचा शोध घेतला जात असून, यात अद्याप कोणाला पकडण्यात आलेले नसल्याचे सांगण्यात आले आहे. अधिक तपास सहकारनगर पोलीस करत आहेत.


Post a Comment

0 Comments